अवघ्या दहा तासांत खुनाचा छडा; स्थानिक गुन्हे शाखेची झपाट्याने कारवाई

अवघ्या दहा तासांत खुनाचा छडा; स्थानिक गुन्हे शाखेची झपाट्याने कारवाई

रायमोहा येथील खून प्रकरणात पोलिसांचा मोठा ब्रेकथ्रू

बीड, दि. २ (प्रतिनिधी):

शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा येथे तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा उलगडा बीड स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दहा तासांत करून आरोपीला अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चांद अल्लाहुद्दीन तांबोळी (वय ३०, रा. रायमोहा) असे मृत तरुणाचे नाव असून तो व्यवसायाने पेंटर होता. रविवारी (दि. १ फेब्रुवारी) सकाळी ‘बीडला जातो’ असे सांगून तो मोटारसायकलवरून घरातून निघाला होता. मात्र रात्रीपर्यंत तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याच्या हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

सोमवारी सकाळी रायमोहा परिसरात त्याचा रक्तबंबाळ मृतदेह आढळून आला. डोक्यावर दगडाने जबर मारहाण करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून त्याच जखमांमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे संशयित आरोपीला बीड शहरातून ताब्यात घेण्यात आले.

या खुनातील आरोपी अतिक गुलाब तांबोळी (वय २९, रा. इस्लामपुरा, बीड) असल्याचे निष्पन्न झाले आहे. पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातूनच हा खून केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी शिरूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. अवघ्या दहा तासांत खून प्रकरणाचा छडा लावल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक पूजा पवार, ठाणे गुन्हे शाखा निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पो. अश्फाक सय्यद, पो. राहुल शिंदे,पो. मनोज परजणे, विकी सुरवसे व स्थानिक गुन्हे शाखेची टीम यांनी अवघ्या दहा तासात गुन्हा उघडकीस आणत खुनातील आरोपीला जेरबंद केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *